Reservations for mayor posts announced : नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी जाहीर होणार
मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर पार पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत सोमवारी मंत्रालयात काढली जाणार आहे. यावेळी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील 247 नगरपरिषदांमध्ये आणि 42 नगरपंचायतींमध्ये थेट नगराध्यक्षपदांच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निवडणूकपूर्व प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे.
राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या सदस्यपदाचे आरक्षण 13 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात अधिसूचना काढली असून, सोडतीनंतर प्रारूप आरक्षण जाहीर केले जाईल. त्यावर 14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान हरकती आणि सूचना दाखल करता येतील. सर्व हरकतींचा विचार करून अंतिम आरक्षण 3 नोव्हेंबर 2025 रोजी राजपत्रात प्रकाशित केले जाईल.
नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठीची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यावर 13 ऑक्टोबरपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 28 ऑक्टोबर 2025 रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. या याद्या विधानसभा मतदारसंघाच्या यादीवर आधारित असणार असून, आयोगाकडून नावांची भर, कपात किंवा दुरुस्ती केली जाणार नाही
दिवाळीनंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार असल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा सोमवारी होताच अनेक नगरांमध्ये निवडणूक सरगर्मी वाढण्याची शक्यता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response